अपघाताची शक्यता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। रसायनी । वार्ताहर ।
दांड फाटा – रसायनी रस्त्यावरील चांभार्ली उतारावरील सेबी वळणासमोरील मुख्य रस्ता खचला असून या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवस पडत असलेल्या दमदार पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.शिवाय पाताळगंगा नदीनेही बुधवारी दुपारी इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दांड रसायनी रस्त्यावरील सेबी वळणावर पाणीवाहक मो-यावरुन पाणी जात असल्याने रस्ता खचला आहे. शिवाय शिवनगर आगरी कट्टा, स्टेट बँक ऑफ इंडिया या समोरील ही रस्ता खचला असून या परिसरात मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
सदर परिस्थिती कायद्याचे रक्षक असणा-या रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी बुधवार दि.13 रोजी पाहिली त्यांनी तत्काळ माजी सरपंच संदिप मुंढे यांची जेसीबी मागवून सेबी वळणासमोरील रस्त्यालगतच्या मोठ्या व्यासाच्या मो-या सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या उपस्थितीत साफ करून घेतल्या.व रस्त्यांवरून जाणा-या पाण्याचा योग्य मार्ग काढला परंतु आसपासचा रस्ता खचल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनाजी तिळे यांना रस्त्याची परिस्थिती समजावली. व सदर खचलेल्या रस्त्याला धोकादायक क्षेत्र अशी लाल रंगाची पट्टी लावली.यावेळी रसायनी पोलिस व माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या सहकार्यातून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.
दरम्यान पाताळगंगा नदीने दुपारी तीन नंतर इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते.दमदार पाऊस असाच सुरू राहिला तर संकट ओढावणार असल्याची भीती नागरिकांच्या मनात आहे.मुसलधार पावसामुळे रसायनी पाताळगंगा परिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.यासाठी रसायनी पोलिस कायदा सांभाळत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक कार्यांत अग्रेसर राहिल्याचे चित्र बुधवार दि.13 जुलै रोजी दिसून आले.