चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा

बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

बार्सिलोनाने पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनवर 3-2 अशा फरकाने मात केली. दोन गोल नोंदवणारा ब्राझिलियन आक्रमकपटू राफिनिया बार्सिलोनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. घरच्या मैदानावर खेळणार्‍या पॅरिस सेंट-जर्मेन संघाने उत्तरार्धाच्या सुरुवातीला 2-1 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर बार्सिलोनाचे प्रशिक्षक झावी यांनी काही बदली खेळाडूंना मैदानावर उतरवले. यापैकी मध्यरक्षक पेड्री आणि बचावपटू आंद्रेस ख्रिास्टिन्सन यांनी सामन्यावर मोठा प्रभाव पाडला. प्रथम पेड्रीने दिलेल्या पासवर राफिनियाने बार्सिलोनाला 2-2 अशी बरोबरी करून दिली, तर ख्रिास्टिन्सनने हेडर मारून गोल करत बार्सिलोनाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर हीच आघाडी निर्णायक ठरली.

बार्सिलोनाकडून राफिनियाने (37 आणि 62व्या मिनिटाला) दोन, तर ख्रिास्टिन्सनने (77व्या मि.) एक गोल केला. सेंट-जर्मेनसाठी ओस्मान डेम्बेले (48व्या मि.) आणि विटिनया (50व्या मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. विशेष म्हणजे डेम्बेले बार्सिलोनाचा माजी खेळाडू आहे. बार्सिलोनाचा तारांकित आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्की आणि सेंट-जर्मेनचा तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापे यांना फारशी चमक दाखवता आली नाही.

अ‍ॅटलेटिको माद्रिद विजयी
उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिदने बुरुसिया डॉर्टमंडवर विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळणार्‍या अ‍ॅटलेटिकोने पहिल्या टप्प्यातील हा सामना 2-1 असा जिंकला. अ‍ॅटलेटिकोसाठी रॉड्रिगो डी पॉल (चौथ्या मिनिटाला) आणि सॅम्युएल लिनो (32व्या मि.) यांनी, तर डॉर्टमंडसाठी सेबॅस्टियन हालेरने (81व्या मि.) गोल केला.
Exit mobile version