पाकिस्तानच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी

भारताच्या लढती यूएईमध्ये?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करणार आहे, त्यासाठी आयसीसीने यजमानपदाचे त्यांना हक्क दिले आहेत. जरी पीसीबीने बीसीसीआयची अट मान्य केली, तरी असे वृत्त आहे की, भारत पाकिस्तानमध्ये नव्हे तर, यूएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची आपले सामने खेळू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) मुख्यालयात एका समारंभात या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्याचे अधिकार प्राप्त केले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ आणि आयसीसी जनरल कौन्सिल जोनाथन हॉल उपस्थित होते.

पीसीबीने यजमान पदाचे हक्क मिळवले असूनही, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला पाठविण्याबाबत बीसीसीआय अनुकूल दिसत नाही. बीसीसीआयने पाकिस्तानातील सुरक्षेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. याआधीही आशिया चषक 2023 स्पर्धेत टीम इंडिया हायब्रीड मॉडेलमध्ये खेळली होती. त्यावेळीही या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. भारताने त्यांचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळले होते. या अंतर्गत, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे तो सामनादेखील पाकिस्तानकडून काढून घेण्यात आला होता.

झका अश्रफ आणि संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत असे सूचित केले गेले आहे की, जर भारताने या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला, तर यूएईमध्ये भारताचे सामने खेळवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जाऊ शकतो. यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही सामान्यांचे अधिकार हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

स्पर्धेसाठी दोन गट
जे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये 8 संघ खेळतील. चार संघांचे दोन गट तयार केले जातील. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरी गाठतील आणि त्यानंतर त्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहचतील. फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये पाकिस्तानमध्ये अडीच आठवडे चालणारी 15 सामन्यांची ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
Exit mobile version