अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

पुरूष व महिला उपांत्य फेरींचा थरार

| पुणे | प्रतिनिधी |

बाणेर येथील बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्तविद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडत असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पुरूष विभागात पुणे ग्रामीण व अहमदनगर संघाने अतिंम फेरीत प्रवेश केला आहे. तर, महिला विभागात पुणे ग्रामीण व रत्नागिरी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

पुरुष विभागात पुणे ग्रामीण संघाने नंदुरबार संघावर 33-26 गुणांनी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यांतराला पुणे ग्रामीण संघकडे 20-13 अशी आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या अक्षय सूर्यवंशी, तुषार आधावडे यांनी चौफेर चढाया केल्या. तर, ऋषिकेश भोजने व ओमकार लालगे या खेळाडूंनी पकडी घेतल्या. नंदुरबारच्या ओंकार गाडे व रविंद्र कुमावत यांनी वेगवान खेळ केला. परंतु, ते आपला पराभव टाळू शकले नाहीत.

पुरूष विभागातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अहमदनगर संघाने पुणे शहर संघावर 47-37 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे 29-17 अशी आघाडी होती. अहमदनगर संघाच्या शिवम पठारे व शंकर गडई यांनी चौफेर चढाई करीत विजय मिळविला. प्रफुल्ल झावरे व संभाजी वाबळे यांनी पकडी घेतल्या. पुणे शहर संघाच्या सुनिल दुबिले, तेजस पाटील यांनी वेगवान खेळ करीत चढाई केल्या व बालाजी जाधव व किरण मगर यांनी सुरेख पकडी घेतल्या.

महिला विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पूर्व संघावर 44-42 अशा विजय मिळविला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघ 16-19 असा पिछाडीवर होता. यानंतर पुणे ग्रामीण संघाने आपले आक्रमण वाढविले व बचाव देखील सुरेख केला. परिणामी त्यांनी विजय मिळविण्यात यश आले. पुणे ग्रामीणच्या निकिता पडवळ हिने चौफेर चढाया केल्या. तर, कोमल काळे हिने चांगल्या पकडी घेतल्या. मुंबई उपनगर पूर्वच्या हरजित संधू हिने आक्रमक खेळ केला. तर, प्रांजल पवार हिने पकडी केल्या.

महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रत्नागिरी संघाने पिंपरी चिंचवड संघावर 22-20 अशा गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला रत्नागिरी संघ 8-9 अशा गुणांनी पिछाडीवर होता. रत्नागिरीच्या समरिन बुरोडकर हिने शानदार खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तस्मिन बुरोडकर हिने चांगल्या पकडी केल्या. पिंपरी चिंचवडच्या मानसी रोडे व रेखा राठोड यांनी जोरदार प्रतिकार केला. तर, पूजा शेलारने चांगल्या पकडी घेतल्या.

Exit mobile version