जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता

जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 5 ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

दिनांक 10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू असल्याने दिनांक 8 सप्टेंबर पासून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता राहील. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या 3-3 रांगा करू नये. एकेरी वाहतूक सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
अतिवृष्टीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी बसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू,विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे.
आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. आपले जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत. अतिवृष्टीच्या बाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा.
रेडिओ साठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पाऊस पडत असताना मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.
विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे. मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141- 228473 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141- 22097 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतिने करण्यात आले आहे.

Exit mobile version