चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार; इथे क्लिक करा आणि थेट प्रक्षेपण पहा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उद्या 23 ऑगस्ट…प्रत्येक भारतीयांना अभिमानास्पद वाटावी आणि समस्त जगावा हेवा वाटणारी अशी अद्भभूत घटना नभी घडणार आहे. चंद्र आहे साक्षीला…हे गीत गुणगुणत भारताचे महत्वकांक्षी चांद्रयान सुखरुप उतरेल आणि अवकाश संशोधनात भारत जगाच्या नकाशावर पुन्हा उजळून निघेल.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ‘चांद्रयान-3’ हे बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असणार आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी समस्त भारतीयांना मिळणार आहे. कारण, चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी उतरण्याची प्रक्रिया आणि त्याचं थेट प्रक्षेपण सुरू केलं जाईल.

भारत चौथा देश
चांद्रयान बुधवारी नियोजित वेळेत सुखरुप उतरले तर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा मान भारताला मिळणार आहे. विक्रम लँडर सध्या चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधत आहे. चंद्रावर ठिकठिकाणी खडकाळ आणि खड्डे असलेली जमीन आहे. त्यामुळे उतरण्यासाठी सपाट जमीन शोधण्याचा प्रयत्न विक्रम लँडर करत आहे. ही प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.

हवामानावर अवलंबून
चांद्रयान नियोजित वेळेत सुखरुपपणे उतरावे यासाठी इस्त्रोने तयारी सुरु ठेवली आहे.पण जर हवामान योग्य नसेल तर चांद्रयान बुधवार ऐवजी गुरुवारी नियोजित उतरविले जाणार आहे.आकाश निरभ्र राहिले तर ते चांद्रयान नियोजित वेळेनुसार चंद्रावर दाखल होणार आहे.हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावरा जोरदार तयारी सुरु केलेली आहे.

मोबाईलवरुही पहा
मोबाईलवर चांद्रयानाचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्हाला इस्रोच्या फेसबुक किंवा यूट्यूब चॅनलवर जावं लागेल. यूट्यूबवर isroofficial5866 या नावाने हे चॅनल आहे. सोबतच इस्रोच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन देखील तुम्ही लाईव्ह पाहू शकता. याव्यतिरिक्त नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही चांद्रयान-3चं लँडिंग पाहू शकता,असे जाहीर करण्यात आले आहे.

Exit mobile version