। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 19व्या सामन्याच्या तारखेत बदल जाहीर केला आहे. हा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना मूळतः 6 एप्रिल रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर नियोजित होता. परंतु, त्याची तारीख बदलली गेली आहे. कोलकाता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला शहरात उत्सवांमुळे पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येणार नाही आणि त्यांनी हा सामना दुसरीकडे हलवण्याची विनंती केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रॉडकास्टर्सनी हा सामना 8 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता घेण्याची शिफारस केली होती आणि ही विनंती मान्य करण्यात आली आहे. उर्वरित वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. रविवार दि.6 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात रात्री एकच सामना होईल. मंगळवारी 8 एप्रिल रोजी दोन सामने खेळवले जातील. दुपारी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट असा सामना होईल आणि संध्याकाळी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना ठरलेल्या वेळेनुसार होईल.