| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बदलणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत. यात विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी तयार होणारा ‘ईस्टर्न एंट्री इंटरचेंज’ प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या सहा महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 800 कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाचे काम करत आहे. ‘क्लोव्हर लीप’ इंटरचेंजमुळे पनवेल शहर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये फुलपाखराच्या आकाराचा विना-सिग्नल उड्डाणपूल आणि जोडरस्त्यांचे मोठे जाळे तयार केले जात आहे. या उड्डाणपुलामुळे गाढी नदीवरील खाडीमार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत विना-अडथळा पोहोचू शकतील, अशी या मार्गाची रचना करण्यात आली आहे.
ईस्टर्न इंटरचेंजच्या धर्तीवर विमानतळाच्या उलवा बाजूस वेस्टर्न एंट्री इंटरचेंज या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. या इंटरचेंजमुळे अटल सेतूवरून मुंबईच्या दिशेने आलेल्या वाहनांना थेट विमानतळ गाठणे शक्य होणार आहे. उड्डाणपूल, गोलाकार चौक आणि उंच मार्गांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई आणि पनवेलचा विमानतळाशी अखंडित संपर्क साधला जाणार आहे. ही पायाभूत सुविधा पनवेल शहराच्या विकासाला मोठी गती देणारी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेल शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतू-पामबीच मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापर्यंत थेट पोहचता येणार आहे. कळंबोली सर्कल, खांदेश्वर तसेच पनवेल शहर या परिसरातील वाहनचालकांना या मार्गाचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे.







