| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आणि आसपासच्या पाणथळ भागात दरवर्षी जानेवारीत गर्दी करणारे फ्लेमिंगो यंदा मात्र अपेक्षेप्रमाणे दिसून आलेले नाहीत. हिवाळ्याचा अर्धा टप्पा उलटूनही मोठ्या फ्लेमिंगोंच्या गुलाबी थव्यांचे आगमन न झाल्याने पक्षीप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि छायाचित्रकारांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साधारणपणे डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात खाडी आणि पाणथळ परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. मात्र यंदा काही ठिकाणी मोजकेच फ्लेमिंगो दिसत असून, ठाणेखाडी, तुर्भे परिसर आणि नवी मुंबईतील काही पाणथळ भाग व तलावांमध्ये फ्लेमिगोंची संख्या अत्यल्प असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. काही पर्यावरण अभ्यासकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, खाडीतील पाण्याच्या गुणवत्तेत झालेला बदल आणि अन्नसाखळीवर परिणाम करणारे घटक यासाठी कारणीभूत असू शकतात, असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. फ्लेमिंगो उशिरा येण्याची ही पहिली वेळ नाही. खाडीतील पाणीपातळी, क्षारता आणि शांतता या घटकांमध्ये सुधारणा झाली, तर फेब्रुवारीतही ते दाखल होऊ शकतात, असे मत पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. पक्षीप्रेमी मात्र फ्लेमिंगोंची संयमाने वाट पाहत आहेत.






