जिल्ह्यात रामनामाचा जयघोष

आक्षी येथील श्री राम पालखी सोहळा

अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या मंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठेनिमित्त जिल्ह्यातील मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. अभिषेक, पूजा, पालखी मिरवणुका, भजन, कीर्तन, महाआरती अशा विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांबरोबर जय श्रीराम असा गजर करण्यात आला होता. सोमवारी (दि. 22) जिल्ह्यातील मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच गावांगावामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी रामनामाचा एकच गजर केला.

नेरळ येथील 1938 साली बांधलेले श्रीराम मंदिर

नेरळ गावात त्यावेळी याच भागात बाजारपेठ होती आणि देश पारतंत्र्यात असताना श्रीराम मंदिराची उभारणी 1938 साली भालचंद्र गणपत बदले आणि अनिल बदले यांनी बदले कुटुंबाच्या तीन गुंठे जमिनीवर मंदिराची उभारणी केली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती अशी मंदिरातील गाभार्‍याची रचना असून कौलारू दुमजली वास्तू बदले कुटुंबाने उभारली आहे.


संपूर्ण सागवान लाकडे या मंदिराचे उभारणी साठी वापरण्यात आली होती. तर कौलारू अशा या मंदिराचे व्यवस्थापन श्रीराम देवस्थान ट्रस्ट कडून केले जाते. सध्या मंगेश बदले आणि सुशांत बदले हे मंदिराचे व्यवस्थापन पाहत असून बदले कुटुंबाच्या मालकीचे हे मंदिर नेरळ ग्रामस्थ यांच्यासाठी कायम खुले असते. त्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत इमारतींवर ध्वज उभारले

अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या मंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठेनिमित्त कर्जतमध्ये अनेक इमारतींवर ध्वज लावण्यात आले आहेत.


तसेच, आकाश कंदील तसेच इमारतींच्या गेटवर गुढ्या उभारुन रांगोळी काठण्यात आल्या. अनेक इमारतींच्या सोसायटीच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे कर्जतमध्ये आनंददायी वातावरण पसरले होते.

शिशु मंदिर शिक्षकांची शोभायात्रा

अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीरामाच्या मंदिरातनिमित्त कर्जतमधील शिशु मंदिर शाळेच्या शिक्षकांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशु मंदिर शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका रेखा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सहशिक्षिका यांनी कर्जत शहरामधून शोभायात्रेचे आयोजन केले होते.


यामध्ये सायली जोशी यांनी श्रीराम, अनिता जोशी यांनी लक्ष्मण आणि उल्का सुतार यांनी सीतामाता यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या, रामनामाचा गजर करून ही शोभायात्रा संपूर्ण कर्जतमधून फिरून शिशु मंदिर शाळेच्या आवारात आल्यावर समारोप करण्यात आला.

मुरुड तालुका राममय

मुरुड जुनी पेठ येथील श्री काळभैरव विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर राममय झाली होती. रांगोळ्या आणि श्रीरामाचा चित्र असलेल्या भगवे ध्वज घरोघरी लावण्यात आले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना मुरुड जुनीपेठ, कुंभारवाडा, अलंकापुरी याठिकाणी तेवढ्याच उत्साहाने भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते.


मुरुड जुनी पेठ, अलंकापुरी येथुन ते श्री काळभैरव विठ्ठल रखुमाई मंदिरा पर्यंत श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी श्री काळभैरव विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष विश्‍वास चव्हाण व कार्यकरणी व परिसरातील महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.

उत्सव अयोध्याचा आनंद चिरनेरकरांचा

प्रभु श्रीरामाचे जन्म स्थळ असलेल्या अयोध्या नगरीत धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून चिरनेर गावातील श्री राम मंदिरात अयोध्याहून आणलेल्या श्री रामाच्या मुर्तींचे दर्शन राम भक्तांनी घेतले.


यावेळी मंदिरात महा यज्ञकुंड, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंदिरात काकड आरती, हरिपाठ, भजन, महा यज्ञकुंड या सारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनामुळे चिरनेर नगरी श्रीरामाच्या नावाने दुमदुमली होती.

गुजराती समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम

कर्जत दहिवली गुजराती समाजाच्या वतीने कर्जत शहरात पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चे कंपनीने विविध वेशभूषा करुन शोभायात्रेत भाग घेतला. ही शोभायात्रा संपूर्ण कर्जत बाजारपेठेतून फिरून कर्जतच्या टिळक चौकामध्ये आल्यावर लहान मुलांनी रामावर आधारित नृत्य सादर केले. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.


या शोभायात्रेत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किरण ठाकरे, सागमचे अभिजीत मराठे, संदीप भोईर अदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरणमध्ये भव्यदिव्य रॅलीचे आयोजन

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भव्यदिव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी रामाचा जयघोष करीत रॅली शहरात फिरवून गणपती चौक राम मंदिरात रॅलीचे विसर्जन झाले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई ही रॅलीत सहभागी झाली होती. यावेळी राम भक्त पारंपरिक वेशभूषेत रॅलीत सहभागी झाले होते. शहरासह तालुक्यातील मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे.


मंदिर, गावात रांगोळीने रामाच्या भक्तीत सर्वजण तल्लीन झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते.

नेरळमध्ये शाळांच्या प्रभात फेर्‍या

प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत असताना नेरळ गावात स्थानिक खासगी शाळांनी प्रभात फेर्‍या काढल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान रामनामाचा घोषणा देत रॅली काढली. त्यामुळे नेरळ गावात रामनामाचा जयघोष ऐकावयास मिळाला. विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रॅली काढली.

विद्या विकास मंदिर संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी ब्राम्हण आळी येथून शाळेचे आवारातून काढलेली रॅली हनुमान मंदिर मार्गे बाजारपेठ असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जुन्या बाजारपेठ येथील श्रीराम मंदिर येथून कुंभार आळी मधून पुन्हा शाळेत पोहचली. या पालखी सोहळ्याचे अग्रभागी असलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रभू श्रीराम, लक्ष्मण,सीतामाई,हनुमान यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी नेरळ ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत असताना मात्र विद्यार्थी हे रामनामाचा जयघोष करीत होते.

माथेरान श्रीराम मंदिरात भाविकांची गर्दी
माथेरानमधील श्रीराम मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराच्या समोरील भागात महिलांनी आकर्षक रांगोळी काढून वातावरण प्रसन्न केले होते. भक्तिगीते आणि सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता.


दुपारी साडेबारा वाजता अयोध्येत श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तो क्षण मोठया स्क्रीनवर दाखविण्यात आला याच दर्शन आबालवृद्ध भाविकांनी कृतकृत्य होऊन घेतले. त्यावेळी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Exit mobile version