महावितरणचा अनागोंदी कारभार

रात्री-अपरात्री वीजपुरवठा होतोय खंडित

| हमरापूर | वार्ताहर |

पेण शहरासह तालुक्यात परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागला असून, या परिसरातील वीज ग्राहकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे येथील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात व आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडू लागला आहे. या समस्येमुळे येथील लघुउद्योगांवर परिणाम होऊ लागला असून, वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विजेचा लपंडाव सुरू असूनदेखील महावितरणतर्फे वीज ग्राहकांना अवाढव्य रकमेची बिले मात्र वेळच्या वेळी पाठविली जातात. पण, वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु ठेवण्याबाबत महावितरण कंपनी असमर्थ ठरु लागल्याचे दिसत आहे. अवाढव्य रकमेच्या वीज बिलांवरुन ग्राहक व महावितरणचे अधिकारी यांच्यामध्ये वाद होण्याचे प्रकार तर अनेक वेळा घडत असतात.

हमरापूर, जिते, खारपाडा, कोप्रोली, वाशी, शिर्की, मळेघर, कांदळेपाडा ते वडखळ भाग तसेच गडब, कासुर्डी भागांतील गावांचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून रोज रात्री, मध्यरात्री खंडित होत आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारी करुनही अद्यापि जैसे थे परिस्थिती आहे.

Exit mobile version