वाकण -पाली-खोपोली मार्गाचे शुक्लकाष्ठ संपेना

निकृष्ठ कामामुळे रस्त्याला भेगा व खड्डे
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
वाकण – पाली – खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे काम 2016 पासून सुरू आहे. मागील 6 वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ठ दर्जाचे काम अशा विविध समस्येच्या गर्तेत हा राज्यमहामार्ग सापडला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित केले जात आहेत. परिणामी 198 कोटी रूपयांचा चुराडा होतांना दिसत आहे.

या मार्गाचे काम सुरू झाल्यावर वाहन चालक व प्रवाशांना अत्यंत उत्तम दर्जेदार रस्ता मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र यावर पाणी फिरतांना दिसत आहे. सुरुवातीस हा मार्ग बनविण्याचे काम करणार्‍या कंन्ट्रक्शन कंपनीच्या निकृष्ट व ढिसाळ कामामुळे त्यांचे कंत्राट रदद् करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या कंन्ट्रक्शन कंपनीने देखील दिरंगाई व खराब काम केल्याने त्यांच्याकडून काम काढून तिसर्‍या एका कंन्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. रस्त्याच्या कामासाठी तब्बल तीन कंन्ट्रक्शन कंपन्या झाल्याने नव्याने बांधण्यात आलेला रस्त्याला अक्षरशः भेगा पडल्या आहेत. अर्धवट कामामुळे रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तयार रस्ता समतल नाही, मोर्‍या खचून त्याला भगदाड पडले आहे. तसेच जुन्या मोर्‍यांचे बांधकाम न तोडता त्यावर नवीन काम करण्यात आले आहे. याबरोबरच नव्याने तयार केलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांला पाणी न मारणे, तसेच ताबडतोब वाहने जाण्यास सुरुवात केली आहे. अवघड वाहतूक, आदी कारणांमुळे रस्त्यांचा दर्जा घसरत चालला आहे. खड्डे आणि निकृष्ठ रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. अशा असंख्य कारणांमुळे या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. 6 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत अवघे 39 किमीचे हे कामपूर्ण झाले नाही. तर मग रस्त्यासाठी अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार ? या राज्य महामार्गाची समस्येच्या गर्तेतून सुटका कधी होणार? चांगला रस्ता केव्हा मिळणार? की सरकारचे 198 कोटी रुपये पाण्यात जाणार ? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे.

वाकण-पाली-खोपोली हा राज्य महामार्ग क्र. 548 (अ) असून हा मार्ग एकूण 39 किलोमीटरचा लांबीचा आहे. रस्त्याची रूंदी 30 मीटर असून यामध्ये कॉन्क्रिकरण, साईटपटटी, गटार रस्त्याच्या दुतर्फा झाडे अशा प्रकारचा रस्ता होणार आहे. वाकण ते पाली हा 9 किमी रस्त्याचे डांबरीकरण होत आहे. आणि पाली ते पाली फाटा या 30 किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण होत आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सन 2016 पासून हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाची गती व दर्जा पाहता या रस्त्याचे काय होणार हा प्रश्‍नच आहे.

सोयीचा मार्ग
वाकण -पाली- खोपोली राज्य महामार्ग पुणे-मुंबई वरून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बेंगलोर महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याच बरोबर येथून विळे मार्गे पुणे आणि माणगावला ही जाता येते. त्यामुळे मुंबई पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.

सुरक्षेला फाटा
रुंदीकरणाचे काम करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घेतलेली दिसत नाही. रस्ता रुंदीकरणाच्या कामात रस्त्याच्या भरावापासून, खोदकाम, मोरी बांधणे, सूचना फलक लावणे, काँक्रीट टाकणे तसेच रस्ता कापण्याच्या कामात कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला अवैध्य बांधकामे आहेत.

या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. खराब रस्त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रूपये पाण्यात जाणर असल्याचे दिसत आहे. आधीचा डांबरी रस्ता बरा होता असे म्हणावे लागत आहे. शासन कोटयावधी रूपये खर्च करते पण रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाही.

– अमित निंबाळकर, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, सुधागड तालुका

नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेला रस्ता हा तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. नियमानुसार 28 दिवसानंतर सदर रस्ता हा वाहतुकीस खुला करण्यात येतो. असे न केल्यामुळे रस्त्यावर खडी निघालेली दिसत आहे व रस्त्याला भेगा पडलेल्या दिसतात. सर्व मोर्‍यांचे ऑडिट करण्यात आले असून ज्या मोरी चांगल्या स्थितीत आहेत अशा मोरीवर स्लॅप टाकण्याचे काम सुरू आहे आणि जे धोकादायक आहेत ते तोडून नव्याने बांधण्यात आले आहेत.

– सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
Exit mobile version