दिमाखात अंतिम फेरीत धडक; घेतला 2022 च्या पराभवाचा बदला
। गयाना । वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषकाची दुसरी उपांत्य फेरी भारत आणि इंग्लंड यांच्यात गयाना येथे पार पडली. भारताने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 गडी गमावत 171 धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला चारी मुंड्या चित केले. भारताने इंग्लंडला 103 धावांवर बाद करत 68 धावांनी विजय मिळवत अखेर 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारताने तब्बल दहा वर्षांनी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी भारताने 2014 साली अंतिम फेरी गाठली होती. आता भारताची शनिवारी (दि.29) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे.
दरम्यान, पावसामुळे हा सामना उशिराने सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. आज मात्र, गयानातील परिस्थितीशी जुळवून घेत रोहितने संयमी फलंदाजी केली. विराट कोहलीने टॉप्ली याला षटकार मारल्यानंतर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात 9 धावा काढून बाद झाला. रिषभ पंत देखील केवळ 4 धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भागिदारी केली. रोहित शर्माने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत 57 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने देखील 47 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 23 धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. शिवम दुबे शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने 17 तर अक्षर पटेलने 10 धावा केल्या. तर, इंग्लंडकडून जॉर्डन याने 3 बळी घेतले.
भारताने इंग्लंडपुढे 172 धावांचे आव्हान ठेवले होते. अक्षर पटेलने जोस बटलरच्या रुपात भारताला पहिला बळी मिळवून दिला. बटलरने 23 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने फिल सॉल्टला बाद करत दुसरा धक्का इंग्लंडला दिला. इंग्लंडच्या डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर अक्षर पटेलने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद करून तिसरा धक्का दिला. अक्षर पटेल याच्या गोलंदाजीवर इंग्लंडने आणखी एक बळी गमावला. मोईन अली रिषभ पंतच्या सतर्कतेने यष्टीचीत बाद झाला. कुलदीप यादवने सॅम करनचा बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रुकने 25 धावा करत इंग्लंडच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकदा जीवदान मिळून देखील तो कुलदीप यादव पुढे टिकू शकला नाही. कुलदीपने ब्रुकचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादवने ख्रिस जॉर्डनला 1 धावेवर बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. जसप्रीत बुमरहाने इंग्लंडचा शेवटचा बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हिटमॅनची कर्णधाराला साजेशी खेळी
हिटमॅन रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. रोहितने पहिल्या चेंडूपासून आपला आक्रमक अंदाज दाखवला. विराट कोहली आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. सूर्यकुमार सोबत रोहितने अर्धशतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याने 39 चेंडूमध्ये 57 धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीला दोन षटकार आणि सहा चौकारांचा साज होता. रोहित शर्माने सलग दोन सामन्यात अर्धशतके ठोकली आहे. रोहित 7ने सूर्यकुमार सोबत चौथ्या विकेटसाठी 50 चेंडूमध्ये 73 धावांची भागिदारी केली. तसेच रोहित शर्मा हा बाद फेरीत 50 धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारतीय गोलंदाजांचे वादळ
रोहित शर्माने गोलंदाजीमध्ये एक वेगळी रणनीती वापरण्याचा प्रयत्न केला. 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. यावेळी अक्षर पटेलला रिवर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याने पहिला बळी दिला. तसेच, जॉनी बेयरस्टो, मोईन अली या महत्वाच्या खेळाडूंनाही त्याने बाद केले. जसप्रीत बुमराहने सुद्धा फिल सॉल्टचा महत्त्वाची बळी घेतला. यावेळी कुलदीप यादवनेही हॅरी ब्रुक, सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनल यांना बाद केले.