| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजाई देवीचा वार्षिक रथोत्सव अतिशय पारंपारिक पद्धतीने व उत्साहाने आज साजरा करण्यात येणार आहे. श्रीवर्धनची सोमजाई माता ज्याप्रमाणे श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे, त्याचप्रमाणे अनेक कुलांची कुलस्वामिनी देखील आहे. सोमजाई देवीचे मंदिर हे स्वयंभू असून भवानीतीर्थ नावाने देखील ओळखले जाते. एकाच दिवशी भवानी तीर्थ म्हणजेच सोमजाई, हरिहरेश्वर व काळभैरव यांचे दर्शन घेतले असता दक्षिणकाशीचे पुण्य प्राप्त होते असे बोलले जाते. सोमजाई देवीच्या रथोत्सवास मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा या दिवशी सुरुवात होते. सात दिवस सतत अखंड भजन पहारा सुरू असतो. आठव्या दिवशी दहीकाला होऊन दुपारी संपूर्ण गावसईला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
श्रीवर्धन येथील ग्रामदेवता सोमजाई देवीची स्थापना अगस्ती मुलींनी केल्याचे सांगितले जाते. सोमजाई माता शिवभवानी, शाळीग्राम रुपी अर्धनारी नटेश्वर स्वरूपात आहे. चतु: सीमेवरती शिवशक्ती, कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी, चामुंडायनी इत्यादी देवता आहेत. तर मुख्य देवता सोमजाई शिवभवानी, नंदी, वासुकी ही शाळीग्राम स्वरूपामध्ये आहे. सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये नित्यनेमाने सकाळी सात वाजता व सायंकाळी सात वाजता आरती करण्यात येते. यावेळी शहरातील असंख्य नागरिक आरतीसाठी उपस्थित असतात. रथोत्सवाच्या दरम्यान सात दिवस कसबा भंडारी समाज, सोनार समाज, वाणी समाज व नवी पेठ भंडारी समाज यांचा अखंड भजन सप्ताह सुरू असतो. सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये आज तागायत कौल लावण्याची प्रथा अस्तित्वात आहे.
अनेक नागरिक आपल्यावरती आलेली विविध संकटे किंवा समस्यांवरती देवीच्या मंदिरात येऊन कौल लावत असतात. सोमजाई देवस्थान हे जागृत देवस्थान असल्यामुळे नागरिकांनी लावलेल्या कौलाला योग्य प्रकारे उत्तर देवीकडून मिळते अशी श्रद्धा आहे. पूर्वी साथीच्या रोगांच्या साथी येऊन गावेच्या गावे रोगांमध्ये मृत्युमुखी पडत असत. 1799 साली श्रीवर्धन शहरात देखील प्लेगची साथ आली होती. यावेळी श्रीवर्धनच्या नागरिकांनी देवीला प्लेग पासून मुक्ती मिळावी यासाठी साकडे घातले होते. तेव्हापासून आजपर्यंत सोमजाई देवीची रथयात्रा नित्यनियमाने सुरू आहे. रात्री बारा वाजता सोमजाई मंदिरातून रथयात्रा निघते, ती कसबा पेठ, सोनार आळी, वाणी आळी,मेटकर्णी, नवी पेठ,कुंभार आळी, कसबा पेठ, टिळक मार्ग या ठिकाणी फिरून दुपारी बारा वाजता पुन्हा मंदिरामध्ये रथयात्रेचा समारोप करण्यात येतो. सोमजाई देवीच्या रथयात्रेसाठी महाराष्ट्रभरातून तसेच मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेक भाविक आवर्जून उपस्थित असतात.