। डंडी । वृत्तसंस्था ।
स्कॉटलंडचा गोलंदाज चार्ली कॅसेल याने पदार्पणातच सोमवारी (दि.22) ‘आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक लिग 2’ या स्पर्धेच्या लढतीत विश्वविक्रम नोंदवला आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात चार्लीने 34 चेंडूंत सामन्याला कलाटणी देत विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाही गोलंदाजाला पदार्पणात जे करता आले नव्हते ते स्कॉटलंडच्या या खेळाडूने करून दाखवले आहे.
चार्ली कॅसेलने सोमवारी स्कॉटलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आपले नाव क्रिकेटच्या इतिहास पुस्तिकेत नोंदवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 7 बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने कागिसो रबाडाचा पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा विक्रमही मोडला. ओमानविरुद्धच्या लढतीत चार्लीने 5.4 पैकी 1 षटक निर्धाव टाकून 21 धावा देताना 7 बळी घेतले. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला एकदिवसीय पदार्पणात 7 बळी घेता आले नव्हते. पण, कॅसेल इथेच थांबला नाही. त्याने सातवा बळी घेत इतिहास रचला. ओमानचा संपूर्ण संघ 21.4 षटकांत 91 धावांत तंबूत परतला आणि स्कॉटलंडने 17.2 षटकांत 2 बाद 95 करून विजय मिळवला.







