डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे शारलोट तलाव स्वच्छता

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील शारलोट तलाव स्वच्छता मोहीम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांमार्फत करण्याचे काम हाती घेतले आहे.

माथेरानमध्ये यावर्षी देखील पुन्हा एकदा येथील ब्रिटिशकाळीन असलेला शारलोट तलाव ज्या तलावातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्या तलावाचा गाळ काढून तलावाची स्वच्छता करण्याचे काम धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच श्रीसदस्यांकडून पुढील आठवड्यात दि.26 व 27 जुलै असे दोन दिवसात केले जाणार आहे.

यासाठी कर्जत तालुक्यातील श्रीसदस्य माथेरान येथे शारलोट तलावामधील गाळ काढून तो स्वच्छ करण्यासाठी येणार आहेत. यापूर्वी सुद्धा 2015 साली श्रीसदस्यांमार्फत या तलावाची सफाई करण्यात आली होती. त्यानंतर अजून पर्यंत या तलावाची स्वच्छता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केली गेली नव्हती. याच तलावातून माथेरान शहराला पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा केला जातो. तलाव स्वच्छते बाबतीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे प्रत्येक वेळेस काहींना काही कारणे देत आपली जवाबदारी झटकून टाकत मागे असते.

यावेळेस तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी माथेरान नगर परिषदेने देखील शारलोट तलाव स्वच्छते बाबत पाऊल उचलले होते. परंतु परिषदेला देखील या तलावाची पूर्ण स्वच्छता करून घेता आली नाही. थोड्या फार प्रमाणात तलावाची स्वच्छता करून लाखो रुपये खर्च केले. आत्ता पुन्हा एकदा डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत या तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून आपल्या श्रीसदस्यांकडून ही स्वच्छता मोहीम पूर्ण करून माथेरान शहराला शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी माथेरानमधील स्थानिक नागरिकांनी डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा याचे आभार व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version