रायगडात चैत्राची मनमोहक पालवी

रस्त्याच्या दुतर्फाचे लक्षवेधी दृश्य

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात वनसंपदेचा अमूल्य ठेवा आहे. वेगवेगळ्या ऋतूत येथील वृक्षराजींचे अनोखे रूप पहायला मिळते. चैत्र महिना सुरू झाला की अनेक झाडांची पानगळ सुरू होते, तर काही झाडांना रंगीबेरंगी कोवळी पाने फुटत असतात. यामुळे जंगल, गाव, शहरे व रस्त्याच्या दुतर्फा हे दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत असतात.

ऐन, सावर, साग, पांगारा आदी झाडांची पानगळ झाली आहे. तर, करंज, जांभूळ, उंबर, पिंपळ व पळस आदी झाडांना नवीन कोवळी पालवी फुटत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक झाडाची पालवी विविध लक्षवेधी आकार व गर्द पोपटी, लाल, हिरवा आदी आकर्षक रंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूर्याची किरणे या पानांवर पडल्यावर जणू काही पानांच्या रंगांची उधळण झाल्याप्रमाणे वाटते. पानगळ झालेल्या झाडांमधून कोवळ्या पालवीचे मनमोहक धुमारे फुटलेले एखादे झाड दृष्टिक्षेपात पडले की अनेकांचे लक्ष वेधते. कित्येकांचे मन प्रसन्न करते. वाढत्या उष्म्यात ही कोवळी पालवी डोळ्यांना गारवा देते. या झाडाखाली आलेल्यांना शितल सावली देते. अनेक पशु-पक्ष्यांचे आश्रयस्थान बनते. कित्येक निसर्गप्रेमी व वन अभ्यासक या झाडांचे निरीक्षण करताना दिसतात. अनेक हौशी आवर्जून बहरलेल्या झाडांचे छायाचित्र आवर्जून घेत असतात.

लक्ष वेधक
रायगड जिल्ह्यात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. ऋतुमानानुसार त्यातील काहींची पानगळ होते. तर, काहींना नवीन पालवी फुटते. हे चक्र वैशिष्ट्यपूर्ण व निसर्ग नियमाने सुरू आहे. निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. नवी पालवी फुटलेले झाड हमखास लक्ष वेधून घेते.
परागीभवन
पळस, सावर, बहावा, गुलमोहर, पांगारा आदी काही झाडांना पानगळती झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली अशी झाडे पक्षी, कीटक व काही सस्तन प्राण्यांकडून परागीभवन करून घेतात. पाने नसल्याने झाडांची फुले सहज दिसतात. पक्षी, कीटक फुलांकडे आकर्षित झाल्याने फुलांचे परागीकरण होते.
Exit mobile version