शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात सुसंवाद
। तळा । वार्ताहर ।
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय भवन तळा येथील सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, प्रकल्प उपसंचालक आत्मा शिवाजी भांडवलकर उपविभाग कृषी अधिकारी माणगाव रविशंकर कावळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. राजेश मांजरेकर व जीवन आरेकर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र रोहा, मंडळ कृषी अधिकारी सारिका सावंत, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन लोखंडे व सर्व क्षेत्रीय कर्मचारी, तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर आनंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी कृषी विभाग तळा तालुक्यात राबवित असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. यानंतर उपस्थित शास्त्रज्ञांनी आंबा पुनरुज्जीवन, आंबा पिकात मिरी लागवड, आंबा घन लागवड, खुंटी कलम, आंबा पीक किड रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले व शेतकर्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली. तसेच आंबा पिकातील शेतकर्यांच्या विविध शंकांचे समाधान केले. अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी वंदना शिंदे यांनी शेतकर्यांनी जास्तीत जास्त कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.