स्थानिकांची सत्ताधाऱ्यांवर तीव्र नाराजी
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-आग्राव रस्त्याची ओळख आज ‘खड्ड्यांचा मार्ग’ अशी झाली आहे. राज्य सरकारच्या ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळून दहा महिने उलटले तरी कामाचा मागमूस नाही. चौलमध्ये विकासाच्या नावाखाली फक्त फलक बदलले; रस्ते मात्र तसेच राहिले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून येत आहे. त्यामुळे चौल आणि आग्राव परिसरातील नागरिकांचा संयम सुटला असून, सत्ताधाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चौल-आग्राव रस्त्यावर खड्ड्यांसह चिखल आणि पाण्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकींसह चारचाकी वाहनचालक आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करतात. सरकारने आमचं आयुष्य नरकासमान केलं आहे. हा रस्ता नव्हे तर खड्ड्यांचा महामार्ग झाला आहे, असे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. चौलचे माजी उपसरपंच अजित गुरव यांनी सांगितले की, चौल-आग्राव रस्त्याचे काम 6 डिसेंबर 2024 रोजी मंजूर झाले आहे. कार्यारंभ आदेशही देण्यात आला. परंतु, सहा महिन्यांनंतरही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला असून हे काम जाणीवपूर्वक अडवले गेल्याचा आम्हाला संशय आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी चौलमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सत्तेवर होता; आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप ही आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे चौल-आग्रावर रस्त्यावरून हे राजकारणी एकमेकांवर दोषारोप करत आहेत. राजकीय गोटांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असताना, चौलचा सर्वसामान्य नागरिक मात्र दररोज खड्ड्यात जात आहेत. स्थानिकांचा उपरोध इतका तीव्र आहे की चौलमध्ये विकासाच्या नावाखाली फक्त फलक बदलले; रस्ते मात्र तसेच राहिले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून येत आहे.







