परसबाग स्पर्धेत चौल-सराई शाळेचे देदीप्यमान यश

| चौल | प्रतिनिधी |

सन 202526 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौल-सराई येथील शाळेने उल्लेखनीय व प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी परसबाग उपक्रमांतर्गत विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. सेंद्रिय खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन, रोपांची निगा, किडींपासून संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन, स्वावलंबन तसेच शेतीविषयक ज्ञान विकसित झाले.

या उपक्रमाच्या पाहणीसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद लेखापाल श्री. मोरे, आंदोशी केंद्राचे केंद्रप्रमुख कृष्णकुमार शेळके, शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसह गटशिक्षणाधिकारी के. आर. पिंगळा यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करून परसबाग उपक्रमाचे महत्त्व विशद केले.

परसबाग निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण शेळके, केंद्रप्रमुख कुष्णकुमार शेळके, शाळेचे मुख्याध्यापक मनोक कंटक, शिक्षक पराग पाटील, माजी शिक्षिका समता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे यश संपादन झाले. या यशाबद्दल पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी शाळेला शुभेच्छा देण्यात येत आहेत. चौल-सराई शाळेचे हे यश इतर शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Exit mobile version