चौलची प्लास्टिकमुक्त दत्त यात्रा

| रेवदंडा | प्रतिनिधी |

कोकणातील अलिबाग तालुक्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि जैवविविधतेचा अनमोल खजिना असलेले चौल गाव आता एका नव्या ओळखीने राज्यभरात झळकू लागले आहे. निसर्ग मित्र शैलेश राईलकर यांच्या संकल्पनेतून सलग चौथ्या वर्षी 2 टन प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी रवाना करण्यात आले आहे.

धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले मुंबई-पुण्याचे पर्यटक जिथे शांतता, स्वच्छ हवा आणि निसर्ग सौंदर्याच्या शोधात असतात, त्या सर्व अपेक्षा चौल गाव पुरेपूर पूर्ण करतं. फणसाड अभयारण्याची हिरवी चादर, समुद्रकिनाऱ्याचा खळाळता नाद आणि गावातील मंदिरांची प्राचीन शांतता हे सगळं एखाद्या थकलेल्या माणसाच्या कार्बन फिल्टरला जणू नवजीवन देते. पण हा निसर्ग जपला गेलाय तो स्वतः गावकऱ्यांच्या जागृतीमुळे, त्यांच्या मनातल्या पर्यावरण प्रेमामुळे. संकल्प स्वच्छ चौल, कृती प्लास्टिकमुक्त यात्रा सन 2022 मध्ये निसर्गमित्र शैलेश राईलकर यांनी एक छोटा पण दूरदृष्टी असलेला संकल्प मांडला. चौलच्या दत्तयात्रेनंतर उरलेल्या टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्निर्मितीसाठी उपयोग करायचा. हा संकल्प गावकऱ्यांनी अगदी हृदयाशी धरला आणि पुढे तो एक जनआंदोलन बनला. चार वर्षांपूर्वी सुरू झालेली ही मोहीम 2025 मध्ये चौथ्या वर्षीही तुफान यशस्वी झाली आहे. यावर्षी गावकऱ्यांनी मिळून अभूतपूर्व 2 टन प्लास्टिक कचरा संकलित करून पुनर्निर्मितीसाठी रवाना केला.

संपूर्ण चौल उतरलं मैदानात!
गावातील तरुणाई, महिला बचतगट, गावातील मान्यवर, अगदी छोट्या चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन यात्रेनंतरचा परिसर प्लास्टिकमुक्त केला. यात विशेष ठरली लहानगी स्वरा राकेश काठे. ही चिमुकली सकाळपासून मैदानात उतरली आणि स्वतः प्लास्टिक संकलन करत सहभागी झाली. स्वरासारखी मुलं जेव्हा हात मळवून कामाला लागतात, तेव्हा भविष्याचा समाज किती जबाबदार असू शकतो, याचा प्रत्यय येतो. या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी उपसरपंच अजित गुरव आणि रूपाली सुरेंद्र म्हात्रे यांनी कौतुकाने अभिनंदन केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अधिक भक्कम बनत चालली आहे.
उपक्रम नाही, हवा बचाव अभियान
आज शहरांमध्ये हवा गढूळ, प्रदूषण वाढलेले आहे, पण चौलची हवा अजूनही शुद्ध आहे. हे निसर्गदेवतेने दिलेलं वरदान असलं तरी ते संकल्प, स्वच्छता आणि सातत्य यांनी टिकवलं जात आहे. गावकऱ्यांना हे चांगलं कळलंय की हवा, जंगल, समुद्र आणि निसर्गाची देणगी टिकवली तरच पुढची पिढी निरोगी वाढेल.
प्लास्टिकमुक्त यात्रेचा संदेश
पर्यटनाने गाव फक्त नावारुपाला येत नाही तर गावाला स्वच्छही ठेवायला लागतं. पर्यटक चौलला भेट देतात कारण हे गाव त्यांना शांतता, स्वच्छता आणि निरामय हवा देतं. ही हवा शुद्ध ठेवण्याची तगमगच चौलच्या या उपक्रमातून दिसून येते.
चौलचा संदेश राज्याला
स्वच्छता उपक्रम फक्त एक दिवसाचा नसतो. तो संस्कार असतो. ग्रामस्थांच्या एकतेने, निसर्गप्रेमींच्या धडाडीने आणि कार्यकर्त्यांच्या चिकाटीने चौल गावाला मिळालेली ही नवी ओळख पर्यावरण संवर्धनात राज्यातील प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी आहे.
Exit mobile version