| अलिबाग | प्रतिनिधी |
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्वाचा ठरणारा स्वस्त धान्य दुकानदार त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात सुरु असलेली ही दुकाने एक जानेवारीपासून बंद राहिल्याने त्याचा फटका गोरगरीबांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्विंटल तीनशे रुपये लाभांश प्रत्येक महिन्याला नियमित मिळावे, पॉझ मशीन भंगार झाल्या आहेत. त्या सतत बंद पडत आहेत. त्यामुळे धान्य वितरणामध्ये अडचणी येत आहेत, त्या बदलून देण्यात याव्यात, प्रतिक्विंटल दोन किलोची होणारी घट भरून मिळावी, सन्मानाची वागणूक द्यावी, दहा टक्के ऑफ लाईन धान्य देण्यात यावे, धान्य वितरणाच्यावेळी येणारी घट प्रति क्विंटल एक किलो प्रमाणे मंजूर करावी, प्लास्टीक पिशवीत धान्य वितरीत करण्यात येऊ नयेत, काढण्यात येणाऱ्या जाहिरनाम्यावर स्थगिती देण्यात यावी, 5 जी ई-पॉझ मशीन त्वरित देण्यात यावी, नोव्हेंबरपर्यंतचे लाभांश मिळावे, अशा अनेक मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यात सरकारने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरु केली आहे. त्याचा परिणाम रास्त भाव दुकानदारांवर बसण्याची शक्यता आहे.
आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापूर्वी धरणे आंदोलन केले होते. मात्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने एक जानेवारीपासून बेमुदत संप दुकानदारांनी पुकारला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरु असून शंभर टक्के प्रतिसाद दुकानदारांकडून मिळाला आहे.
चंद्रशेखर देशमुख, कार्याध्यक्ष, रायगड जिल्हा
ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन







