| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील जावळी परिसरातील बाळगंगा धरणाच्या नदीकिनारी असलेल्या करंजाळवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अल्पवयीन मुलगी आणि येथील मुलगा यांचे सुत फेसबुकवर जमले होते. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. एकामेकांबरोबर लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, लग्न करण्याच्या वेळेस मुलाने नकार दिल्याने हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा तालुकाभर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील जावळी भागातील करंजाळवाडी येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी संशयित आरोपीस लग्नाबाबत विचारले असता आरोपीने नकार दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित प्रियकर राहुल वाघे (22) रा. पडघा, ता. कल्याण याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पेण पोलीस ठाण्योच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घाडगे या करीत आहेत.