। पनवेल । वार्ताहर ।
एस.टी. महामंडळाच्या सातारा विभागातील कर्मचार्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे एस.टी. बसमधून फुकट प्रवास करणार्या एकाला महामंडळाच्या सुरक्षा अधिकार्यांनी पकडले. संतोष बाळू जाधव (35) असे त्याचे नाव असून त्याला पनवेल तालुका पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात बनावटगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी जाधव हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शटफळ हवेली येथे राहण्यास असून 28 ऑगस्ट रोजी तो ठाणे-अलिबाग या एस.टी. बसमधून प्रवास करून जात होता. बस सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पनवेल-पेण मार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर आली असताना एस.टी. महामंडळाच्या पेण विभागीय कार्यालयातील सुरक्षा व दक्षता अधिकारी शिवनाथ पाखरे, सहायक सुरक्षा निरीक्षक गोविंद गारळे, वाहतूक नियंत्रक रामचंद्र भोसले या तिघांनी तिकीट तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.