। पनवेल । वार्ताहर ।
कागदपत्रांचा गैरवापर करून ऑनलाइन वेबसाईटच्या आधारे लोकांना पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणार्या निखिल जयंत बरवा आणि सुकांतो तालीशंकर मुलीक यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल येथील जितेन शाह यांचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. पायोनियर सोसायटी जवळ राहणार्या निखिल बरवा (39) याने त्याच्याकडे प्रोजेक्ट असून ओळखीच्या कंपनीमध्ये डायरेक्टरची गरज असल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला चांगला पगार देईन, असे सांगत त्याने जितेन आणि त्यांची पत्नी यांचे केवायसी कागदपत्र मागून घेतले व त्यांना 17 कंपन्यांचे डायरेक्टर बनवले. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये राहत्या घराच्या पत्त्यावर आणखी तीन कंपन्या उघडून यातही त्यांना डायरेक्टर बनवले. मात्र त्यांना कोणताही मोबदला दिला नाही. त्यानंतर दोघांनीही डायरेक्टर म्हणून नावे काढून टाका, असे निखिल याला सांगितले. यावेळी निखिलने सध्या कंपन्या फायद्यामध्ये चालत नसून त्या बंद करणार असल्याचे सांगितले. कोणतीही प्रायव्हेट कंपनी उघडल्यानंतर बंद करण्यास कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर शाह यांनी नाव कमी करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला असता सुकांतो हा त्याचा सीए असून त्याच्याकडून रजिस्ट्रेशनची कामे करून घेत असल्याचे त्याने सांगितले.दरम्यान, सुकांतो याच्या पत्त्याबद्दल निखिलकडे विचारणा केली असता तो नेरूळ येथील घर सोडून गेल्याचे समजले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर शाह दाम्पत्याने या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांत या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.