| रायगड | खास प्रतिनिधी |
निर्माता रत्नकांत जगताप यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यार्या कार्यक्रमातील शिवराज्याभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. ‘जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील पोलीस परेड मैदानावर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक कलाकार अमोल कापसे यांनी सादर केलेला ‘अवतार गाथा’ कार्यक्रम उपस्थितांचे उत्कृष्ट मनोरंजन करुन गेला. यानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. गणेश नमनाने दमदार सुरुवात करत ‘बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल.. करावा विठ्ठल..’ तसेच ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा गीतातून साकारलेल्या पंढरीच्या वारीने उपस्थित रसिकांनाही वारकरी बनविले. ‘झुंजुमुंजु पहाट झाली.., नभं उतरु आलं..चिंबं थरथरवलं..’ अशा ‘एक से बढकर एक’ गीत गायनाने कृषीप्रधान देशातील हिरवाईचा साज गीतामधून साकारत होता. ठाकर गीत, कोळी गीत आणि लावणी नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांना वेड लावले.
रोमांचकारी पालखी नृत्य रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथील नवलाई ग्रुपच्या सदस्यांनी प्रेक्षकांमधूनच ढोल, ताशांचा निनाद करत रंगमंचावर पालखी आणली. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात हे पालखी नृत्य त्यांनी सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग कलाकारांनी जोशपूर्ण गीतांनी आणि नाट्याने जिवंत केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह प्रेक्षकांसमोरुन रंगमंचावर पदार्पण केले. सनई-चौघड्यांसह तुतारीच्या मंगलमयी सुरात सिंहासनाधिश्वर होतात. या प्रसंगाने समस्त उपस्थितीत प्रेक्षक भारावून गेले. ‘जय भवानी.. जय शिवाजी..,छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ या जयजयकारात यावेळी आसमंत दूमदुमून गेला.