जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2024-25
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई उपनगरने संयोजन संस्था चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवलीतील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. चेंबूर क्रीडा केंद्र व एसआयईएस यांनी या कबड्डी स्पर्धेत पूर्व विभाग किशोरी गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर, अभिनव मंडळ व बालवीर स्पोर्टस् यांनी पूर्व विभाग किशोर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
चेंबूर क्रीडा केंद्राने किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात नवशक्ती स्पोर्टस्चा 32-13 असा सहज पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. आक्रमक सुरुवात करीत चेंबुरने पूर्वार्धात 2 लोण देत 21-06 अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामना अगदीच एकतर्फी केला. दुसर्या किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात एसआयईएस संघाने हिड इंडियाचा 41-04 असा धुव्वा उडविला. एसआयईएसने पहिल्या डावात 21-01 अशी भक्कम आघाडी घेत आर्धी लढाई जिंकली होती. दुसर्या डावात तोच जोश कायम राखत 37 गुणांच्या मोठ्या फरकाने अंतिम फेरीत धडक दिली आहे.
किशोर गट पूर्व विभागाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अभिनव मंडळाने चेंबूर क्रीडावर 34-24 अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. विश्रांतीला लोण देत 29-07 अशी आघाडी अभिनवने घेतली होती. विश्रांतीनंतर चेंबुर क्रीडाने लोण देत सामन्यात रंगत आणली. परंतु, अभिनवने आणखी एक लोण देत आपला विजय निश्चित केला. दुसर्या किशोर गटाच्या सामन्यात उपांत्यपूर्व फेरी गाठताना बालवीर स्पोर्टस्ने महाशक्तीला 33-11 असे नमविले. आर्यन वाघमारे, सिद्धार्थ सावंत, रीतीक मेस्त्री यांच्या चतुरस्त्र खेळाने मध्यांतराला 16-05 अशी आघाडी घेणार्या बालवीरने नंतर देखील त्याच जोमाने खेळ करीत आपला विजय साकारला आहे.
कुमारी गटाच्या पूर्व विभागात स्वराज्य स्पोर्टस्ने आराध्य स्पोर्टस्चा 24-04 असा सहज पराभव करीत चौथी फेरी गाठली आहे. पूर्वार्धात 17-07 अशी स्वराज्यकडे आघाडी होती. प्रथम श्रेणी गटात स्वस्तिक मंडळाने सन्मित्र मंडळावर 38-21 असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली आहे. प्रथमच द्वितीय श्रेणीतून प्रथम श्रेणीत बढती मिळालेल्या संमित्राने स्वस्तिकला या सामन्यात कडवी लढत दिली.







