जिते नदीपात्रात रसायनयुक्त पाणी

| महाड | प्रतिनिधी |

महाड औद्योगिक वसाहतीमधून नदीपात्रात रासायनिकयुक्त पाणी सोडण्याचे प्रकार पुन्हा समोर येत असून, जिते ग्रामपंचायत हद्दीतील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्याची तक्रार ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी स्वरूपात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाड एमआयडीसी परिसरात रासायनिक प्रदूषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. जिते येथील नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, गावाच्या प्रवेशद्वारावरही दुर्गंधीचा त्रास जाणवत आहे. या नदीपात्रात गुरेढोरे तसेच इतर प्राणी पाणी पिण्यासाठी जात असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी म्हात्रे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, पावसाळ्यात नदीपात्रात रासायनिक पाणी सोडण्याचे प्रकार घडत असताना आता संभाव्य पाणीटंचाईच्या काळातही नदीपात्रात केमिकल सोडले जात असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास या दूषित पाण्याचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होऊ शकतो. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रदूषणाच्या स्रोताची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिते ग्रामपंचायतीने केली आहे.

Exit mobile version