अल्पावधीत वाहतूक सुरळीत, कशेडी टॅप पोलीसांचे यश
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागामध्ये शुक्रवार, दि.25 रोजी ज्वालाग्रही रसायन वाहून नेणारा टँकर कलंडला. कशेडी टॅप पोलिसांना महामार्गावरील वाहतूक तातडीने सुरळीत करण्यात यश आल्याची माहिती कशेडी टॅपचे उपनिरिक्षक पी.एस. धडे यांनी दिली.
कशेडी घाटामध्ये गजानन महाराज मंदिराच्या अगोदर असलेल्या वळणावर उतारात टँकर (जीजे-06-बीटी-7555) हा ब्रेक फेल होऊन रस्त्याच्या डाव्या बाजूस डाव्या कुशीवर कलंडल्याने महामार्गावरील वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ ठप्प ठेवण्यात आली. या टँकरमधील केमिकल (बीटीबीई) हे ज्वालाग्रही असून, थोड्या प्रमाणात गळती होत असल्याने या अपघाताची माहिती स्थानिक पोलीस ठाणे खेड व अग्निशमन खेड नगरपरिषद यांना कळविण्यात आल्याने सदर यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरूवात केली.
टँकर चालकाचे नाव जनक राज सिंग आनंद बहादुर सिंग असे असून (32, रा. राजकुमारपूर, ता. जिगना, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) त्याला पाठीला व हाताला खरचटले आहे. या अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान झाले असून, वाहन रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना अल्पावधीमध्ये यश आले. यावेळी एएसआय सुर्वे यांनी उपनिरीक्षक पी.एस. धडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीवर नियंत्रण ठेवून टँकर रस्त्याबाहेर केल्यावर पूर्ववत वाहतूक सुरळीत करण्यात सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वी प्रयत्न केले.