कशेडी घाटात केमिकल टँकर कलंडला

महिन्याभरातील दुसरा अपघात

। पोलादपूर । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गवरील कशेडी घाटातील भोगावच्या हद्दीत खचलेल्या डेंजरझोन घाटरस्त्यावर गेल्या महिन्यात गॅससिलींडरचा टेम्पो दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातानंतर आता महिनाभरातच केमिकल वाहतूक करणारा टँकर घाटरस्त्यामध्ये आडवा होऊन अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात चालक बचावला आहे.

टँकरचालक अंकित राजेश कुमार यादव (30) हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन लोटे ते दौंड पुण्याकडे जात होता. कशेडी घाटात भोगाव गावाच्या हद्दीतील घाट रस्त्यावर आला असता महामार्गावर असणार्‍या दगड मातीच्या ढिगार्‍यावरून टँकर पलटी झाला. सदरचा रस्ता सुमारे 100 ते 150 फूट लांब व दीड मीटर खोल खचला आहे. चालकाला त्याचा अंदाज न आल्याने सदरचा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या टँकरमध्ये केमिकल असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक समेळ सुर्वे, पोलीस हवालदार शंकर कुंभार, रामागडे, चिकणे यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले. तसेच, एकेरी वाहतूक सुरू ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट मुंबई, पुणे व तळकोकणात ये-जा करणार्‍या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, गेल्या 20 वर्षांपासून भोगावच्या हद्दीत सुमारे 100 ते 150 फूट लांब रस्ता दरवर्षाप्रमाणे यंदाही सुमारे दीड मीटर खाली खचला आहे. या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जाऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने रस्ता खचण्याचे आणि मलमपट्टी करण्याचे सातत्य कायम राहिले आहे. या खचलेल्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याच्या व अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी पोलादपूर तालुक्यातील प्रवासी जनतेकडून उघडपणे व्यक्त होत आहे. यासोबतच धामणदेवी ते कशेडी बंगला या 6 कि.मी.अंतरात डांबरीकरणाच्या दुपदरी महामार्गाला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून महामार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे आगामी गौरी-गणपती सणापूर्वी तरी या जुन्या कशेडी घाट रस्त्याची डागडूजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version