पूरपरिस्थितीचा फायदा घेत नाल्यांमध्ये सोडले रसायन

| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
अतिवृष्टीचा फायदा घेत लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी नद्या-नाल्यांमध्ये सोडल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात येत असून याचा जाब विचारण्यासाठी 9 ऑगस्ट या क्रान्तीदिनी लोटे औद्योगिक वसाहतीवर हल्लाबोल करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

गेल्या महिन्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील नद्या-नाल्यांना महापूर आला. खेड, चिपळुण हे दोन्ही शहरे पाण्याखाली गेल्याने या दोन्ही शहरातील व्यापारी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीशी येथील नागरिक झुंज देत असताना लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार मात्र या अतिवृष्टीचा फायदा घेत होते असा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी येथील शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. औद्योगिक वसाहतीच्या जल आणि वायु प्रदुषणामुळे येथील शेती हा व्यवसायच पुर्णपणे संकटात सापडला आहे. नद्या-नाल्यांचे पाणी दुषीत होवून शेतकर्‍यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आंबा, काजू यासारखे नगदी पिक देणारी झाडेही प्रदुषणाची बळी ठरली आहेत. जलप्रदुषणामुळे मासेमारी व्यवसाय सपुष्टात आला आहे.

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या प्रदुषणाचा प्रश्‍न ऐरणीवर असतानाच येथील कारखानदार अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेत कारखान्यात तयार होणारे सांडपाणी नद्या-नाल्यांसह उघड्या शेतामध्ये सोडण्याचे पाप करत आहेत. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना शेतीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version