घरोघरी क्यूआर कोड पुरविणारी चेंढरे ग्रामपंचायत

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

डिजिटल क्रांती करीत क्यूआर कोडच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी अशा प्रकारे कर भरणा करुन घेणारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, नागरिकांचा बर्‍याचशा गोष्टी घरबसल्या मिळाव्यात याच उद्देशातून हा उपक्रम ग्रामपंचायत प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या अमृतग्राम डिजिटल करप्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा मूलभूत पाया म्हणजे करवसुली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची पारंपरिक पद्धत तितकीशी प्रभावीपणे राबविता येत नाही, तसेच आजचे डिजिटल युग अँड्राईडचा वापर सर्रासपणे करीत आहेत. त्याचप्रमाणे कोव्हिड-19 च्या वेळेस नागरिकांना बर्‍याचशा गोष्टी घरबसल्या मिळाव्यात अशा अपेक्षासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सदरची अमृतग्राम डिजिटल करप्राणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसित केलेली असून, ती अत्यंत उपयुक्त आहे. चेंढरे ग्रामपंचायतीमधील सर्व खातेदारांचा डेटा अचूकपणे अपडेट करुन ही अमृतग्राम डिजिटल करप्रणाली यंत्रणा यशस्वीपणे राबविणारी चेंढरे ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत आहे.

सदर करप्रणाली सर्वंकष उपयुक्त होण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्वत: सदर संगणकीय प्रणालीचे सूक्ष्म निरीक्षण करुन त्यामध्ये अतिरिक्त सुधारणा सुचवून त्याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल, अशा प्रकारे विकसित करुन घेतली आहे. जेणे करुन पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली जास्तीत जास्त करण्यासाठी नियोजन आणि पाठपुरावा करणे सुलभ झाले असल्याचे मत सरपंच स्वाती पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सरपंच स्वाती पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रियदर्शनी पाटील, पंचायत समिती उपसभापती मीनल माळी, उपसरपंच प्रणिता म्हात्रे व सदस्य यतिन घरत, ममता मानकर, रोहन पाटील, ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड, टेक्निकल टीम ललीत कदम, निलेश सावर्डेकर, देवेश गवस, स्नेहल मोरे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

क्यूआर कोडमुळे होणारे फायदे
घराच्या दरवाजावर दर्शविलेले घर क्रमांक आता क्यूआर कोडच्या पद्धतीद्वारे दर्शविले आहेत. सदर क्यूआर कोडद्वारे खातेधारकाची माहिती संकलित केली आहे आणि त्याद्वारे खातेधारकाची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली ही मोबाईल अ‍ॅपद्वारे यूपीआय/रोख/धनादेश/क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड तसेच नेट बँकिंगद्वारे केली जाते. घरपट्टी व पाणीपट्टी वसुली झाल्याची पावती संबंधित खातेधारकास मोबाईलवर पीडीएफ स्वरुपात प्राप्त होते. घरपट्टी व पाणीपट्टीचा डिमांड व सवलतीचा संदेश संगणकीय प्रणालीद्वारे खातेधारकास प्राप्त होईल. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीबाबतचे अहवाल पाहता येतात. खातेधारकास आपली घरपट्टी व पाणीपट्टी घरबसल्या लिंकद्वारेसुद्धा भरता येणे शक्य झाले आहे. या प्रणालीचा वापर करुन अँड्राईड मोबाईल आणि डेस्कटॉप कॉम्प्यूटरच्या माध्यमातून अधिकृत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वसुली करणे सोपे झाले आहे. ग्रामपंचायतीच्या उप्तन्न वाढीस निश्‍चीतच आधारभूत झाली आहे.


क्यूआर कोडमुळे करदात्यांकडून जास्तीत जास्त पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली करण्यासाठी नियोजन आणि पाठपुरावा करणे सुलभ होत असून, यामध्ये यश येत आहे.

सरपंच स्वाती पाटील
Exit mobile version