चेन्नई सर्वोच्च स्थानी

कोलकात्यावर मात

| कोलकता | वृत्तसंस्था |

डेव्होन कॉनवे (56 धावा), अजिंक्य रहाणे (नाबाद 71 धावा) व शिवम दुबे (50 धावा) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने येथे झालेल्या आयपीएल लढतीत कोलकता नाईट रायडर्स संघावर 49 धावांनी विजय मिळवला. चेन्नई सुपरकिंग्सने पाचव्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. कोलकता नाईट रायडर्स संघाला मात्र सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकता नाईट रायडर्सचा मोसमातील हा पाचवा पराभव ठरला.

चेन्नईकडून कोलकतासमोर 236 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. तुषार देशपांडे व आकाश सिंग यांनी अनुक्रमे नारायन जगदीशन (1 धाव) व सुनील नारायण (0) यांना झटपट बाद करीत कोलकताचा पाय खोलात नेला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर व कर्णधार नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नाच अय्यर पायचीत बाद झाला. त्याला 20 धावा करता आल्या. रवींद्र जडेजाने राणाला 27 धावांवर बाद करीत कोलकत्याची अवस्था 4 बाद 70 धावा अशी केली.

जेसन रॉय व रिंकू सिंग या जोडीने 65 धावांची भागीदारी करताना कोलकताच्या विजयासाठी प्रयत्न केले. रॉय याने 26 चेंडूंमध्ये पाच चौकार व पाच षटकारांच्या सहाय्याने 61 धावांची खेळी केली. पण माहीश तीक्षणाच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्याचसोबत भागीदारीही संपुष्टात आली. रिंकू सिंगने नाबाद 53 धावा करीत थोडी झुंज दिली. पण कोलकता संघाला 20 षटकांत 8 बाद 186 धावा करता आल्या. तुषार देशपांडे व माहीत तीक्षणा यांनी प्रत्येकी 2 मोहरे टिपले.

दरम्यान, याआधी कोलकता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ॠतुराज गायकवाड व डेव्होन कॉनवे या सलामीवीरांनी आपला फॉर्म कायम राखला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. सुयश शर्माने ॠतुराजला बाद करीत जोडी तोडली. त्याने 20 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी साकारली. कॉनवे याने 40 चेंडूंमध्ये 4 चौकार व 3 षटकारांसह 56 धावांची बहुमूल्य खेळी केली. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्याचा झेल डेव्हिड वीजा याने टिपला. कॉनवे बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या मुंबईकर जोडीने चेन्नईसाठी मोलाची कामगिरी बजावली. दोघांच्या आक्रमक खेळापुढे कोलकताच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही. अजिंक्यने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 6 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी करताना नाबाद 71 धावांची स्फोटकी खेळी केली. शिवमनेही जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूंमध्ये 50 धावांची फटकेबाजी केली. त्याने 2 चौकार व 5 षटकार चोपून काढले. दोघांनी 85 धावांची भागीदारी केली. चेन्नईने 20 षटकांमध्ये 4 बाद 235 धावांचा पाऊस पाडला.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 4 बाद 235 धावा (ॠतुराज गायकवाड 35, डेव्होन कॉनवे 56, अजिंक्य रहाणे नाबाद 71, शिवम दुबे 50, कुलवंत खेजरोलिया 2/44) विजयी वि. कोलकता नाईट रायडर्स 20 षटकांत 8 बाद 186 धावा (जेसन रॉय 61, रिंकू सिंग नाबाद 53, तुषार देशपांडे 2/43, माहीश तीक्षणा 2/32).

Exit mobile version