आशियाई स्पर्धेसाठी पारस भोईरची निवड
| रायगड | प्रतिनिधी |
रायगडचा बुद्धिबळपटू पारस भोईर याने 15 वर्षांखालील राष्ट्रीय सब ज्युनिअर बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. जळगाव येथे जैन स्पोर्ट्स आयोजित 48 वी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. पारसच्या यशस्वी कामगिरीमुळे त्याची आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सब ज्युनिअर बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धा आणि 39 मुलींची राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धा अनुभूती स्कूल, जळगाव येथे 27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली. संपूर्ण भारतातून 85 मुली आणि 130 मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 11 फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत पनवेल-रायगडचा पारस हा 10 व्या फेरीअखेर अपराजित राहून अव्वल स्थानी होता. 11 व्या फेरीत आसामचा मयांक चक्रवर्तीबरोबर त्याचा सामना झाला. या अटीतटीच्या खेळात पारसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राष्ट्रीय विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली. या स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याच्या यशस्वी कामगिरीबद्दल रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना सर्व सदस्य, रायगड बुद्धिबळ खेळाडू आणि पालक वर्ग, बुद्धिबळ मार्गदर्शक यांनी आनंद व्यक्त केला असून, पारस आणि त्याच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे यांनीसुद्धा पारसचे अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







