संतप्त महिलांनी केली रायगड जिल्हा परिषदेकडे तक्रार
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील चेवणे गावातील जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यात स्थानिकांना दोन ते चार दिवसांनी नळपाणी योजनेचे पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेकडे लेखी स्वरूपात केली आहे.चावणे गावातील कविता शेलवले, गीता पारधी, कृष्णा मेंगाळ, नैना मेंगाळ, ताराबाई शेलवले या सारख्या असंख्य महिलांनी पुढाकार घेऊन नळपाणी योजनेच्या कामाबद्दल शंका उपस्थित केली आहे.
चेवणे गावात सुमारे 30-40 घरांची वस्ती असून येथे सर्व समाजाची लोक राहतात. या गावाला काही वर्षांपूर्वी आदर्श ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. मात्र, याच गावात जलजीवन मिशनचे निकृष्ठ दर्जाचे काम केल्याचे आरोप येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत. सन 2022 मध्ये जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या कामाची अंदाज पत्रकीय रक्कम सुमारे 88 लाख असून हे काम अखेर मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यात आले.
या योजनेतून पाणी पुरवठा सुरु व्हावा यासाठी तात्पुरतंय स्वरूपात वीज जोडणी घेण्यात आली होती. त्यावेळी विहिरीत असणार्या समरसिबल मीटर साठी तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन जोडले आहे. परिणामी त्यामुळे गावातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होतो. कामाला सुरुवात झाल्यापासून काम पूर्ण होई पर्यंत शासनाचे कोणतेच अधिकारी वर्गाकडून कामाची पाहणी करण्यात आली नाही असा आरोप ग्रांथ करीत आहेत. तशी नोंद ग्रामस्थांच्या सहीच्या अर्जात जिल्हा परिषद केलेल्या तक्ररीत केली आहे. नळपाणी योजनेचे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरु झाल्यावर मागील अडीच महिन्यात फक्त 15-20 दिवसच पाणी सुरळीत चालू राहिले त्यानंतर मात्र सर्व ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे संबंधित विभागाला तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आले नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.