। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 10 हजारांचा दंड सुनावला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे यांच्यावरील आरोप प्रथमवर्ग न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्यांना दोन वर्ष कारासावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. पण इथे देखील माणिकराव कोकाटे यांच्या पदरी निराशा पडली. कोर्टाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे आता कोकाटे यांच्याविरोधात पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याआधी कोकाटेंनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला असून मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आहे.






