मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री

| मुंबई | प्रतिनिधी |

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशऩाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत दिली आहे.

मराठी भाषा गौरवदिन या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार यावर चर्चा झाली, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांना त्याबाबत विनंती देखील करणार आहे. सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे.

छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. छगन भुजबळ म्हणाले की, कुसुमाग्रजांची जयंती आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या 14 वर्षापासून आपण प्रयत्न करत आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गरजेचे असणारे चारही निकष आपली मराठी भाषा पूर्ण करते. असे असताना देखील अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

Exit mobile version