मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2

जिल्ह्यातील शाळांनी अभियानात सहभागी व्हावे

| खास प्रतिनिधी | रायगड |

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळांप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, गुणवत्ता वाढ व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, तसेच शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियान सुरु होत आहे. 29 जुलै ते 15 सप्टेंबर 2024 असा योजनेचा कालावधी ठरविण्यात आला आहे. पायाभूत सुविधा 33 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुण, शैक्षणिक संपादणूक 43 गुण, अशा पद्धतीने सहभागी शाळांचे गुणांकन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुकास्तरावरील मूल्यांकनाचे कार्य
प्राथमिक स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हे आहेत. तालुका स्तरावरील मूल्यांकन समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी, पंचायत समिती हे आहेत. जिल्हास्तरावरील मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे आहेत.
तालुकास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस आहे, तर इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक तीन लाख, द्वितीय क्रमांक दोन लाख, तृतीय क्रमांक एक लाख रुपयांचे बक्षीस असणार आहे. जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक 11 लाख, द्वितीय क्रमांक पाच लाख, तृतीय क्रमांक तीन लाख रुपये, इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक 11 लाख, द्वितीय क्रमांक पाच लाख, तृतीय क्रमांक तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
Exit mobile version