ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप
। मुंबई । वृत्तसंस्था ।
सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही, असे म्हणत टिकणारं आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. तसेच, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने अहवाल सविस्तर सादर केला. उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उर्दू, मोडीमधील तपशील, पुरावे, नोंदी सापडल्या आहेत, आणखी काही नोंदी सापडतील म्हणून त्यांनी दोन महिने मुदतवाढ मागून घेतली आहे. विस्तृतात पुरावे तपासले. सरकारने दोन महिन्यांची मुदतही त्यांना दिली आहे. अवधी दोन महिन्याचा असला तरी अंतिम अहवाल लवकरात लवकर सादर करा, असे सांगितल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.