विकासकामे ठप्प
| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे हे दि. 20 एप्रिल 2022 पासून ते आजतागायत कोणतेही सूचना आम्हाला न देता अथवा कोणताही रजेचा अर्ज न देता ते गैरहजर आहेत. त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारचा त्यांच्यापासून प्रतिसाद मिळत नसल्याने ते गायब झाले असल्याबाबत व नगरीतील विकासकामे तसेच नागरिकांची कामे ठप्प झाल्याने याबाबतीत राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज करणार असून या अर्जाची प्रत माहितीकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देणार असल्याची माहिती नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
इंगळे हे 10 दिवस गैरहजर असून नगरपंचायतीचे इंजिनियर आकाशबुवा हे देखील गेल्या चार दिवसांपासून गैरहजर असल्याने नागरिकांची कामे प्रलंबित असून विकासकामे ठप्प होऊन मागील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीत गटर व नालेसफाई कामात झालेला भ्रष्टाचार याची माहिती देण्याकरिता नगरपंचायत कार्यालय याठिकाणी नगराध्यक्ष पवार यांनी शुक्रवार दि.29 एप्रिल रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सचिन बोंबले,नगरपंचायतीचे गटनेते प्रशांत साबळे, राजेश मेहता, अजित तारळेकर, शर्मिला सुर्वे, दिनेश रातवडकर,कपिल गायकवाड आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, सन 2020-21 करिता केंद्रीय 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील गटारे व नाल्यांची सफाई करणे हे कामाचे ध्येय मंजूर झाले होते. त्याच्यामध्ये बिल काढल्यानंतर एक वर्षांनी ते सफाई केली हे असे म्हणतात. सफाई केलेली नाही असे पुरावे दाखवत 25 लाख रुपयांचा बिल मागील सत्ताधार्यांनी कुठलेली साफसफाई न करता काढल्याचा गौप्यस्फोट करत भ्रष्टाचार बाहेर काढला व मुख्याधिकारी यांना याबाबत विचारला तर अशा प्रश्नांना उत्तर न देण्यासाठी मुख्याधिकारी बेपत्ता झाले आहेत. याबाबतीत नगरसेवक कपिल गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. नगराध्यक्ष पवार पुढे म्हणाले अजूनपर्यंत मागील प्रोसिडिंग मंजूर करणे हा विषय त्यांना अनेकवेळा सांगून सुद्धा त्यांनी प्रोसिडिंग आमच्या नजरेसमोर कधीही आणले नाही. सभागृहाला ते दिशाभूल करणारे उत्तर ते देत असतात. याबाबत आमच्या प्रतिनिधीने दि.29 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मोबाईलच्या दोन्ही नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
माणगाव न.पं.चे मुख्याधिकारी गायब
