चित्रलेखा पाटील यांनी केली चिकणी पुलाची पाहणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुसळधार पावसात मुरुड तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील चिकणी पुल खचला होता. या मुख्य रस्त्यावरील पूलाला भगदाड पडून नाल्यावरील पुलाचा भागही वाहुन गेला. त्यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते.

शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील ऊर्फ चिऊताई यांनी मुरुड तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील चिकणी पुलाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रमेश गोरे यांची भेट घेऊन पुलाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करा. तसेच, कार्यकारी अभियंता सुखदेवे यांना फोनवर संपर्क साधून तालुक्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा सूचना देण्यात आल्या. मुख्य रस्त्यावरील मुरुड ते अलिबाग आणि अलिबाग ते रोह्याच्या मुख्य रस्त्यावरील छोट्या पूलांच्या (मोऱ्या) संरक्षक कठड्यांची पडझड झाली असून मोठा अपघात होऊन अनर्थ घडू नये या करिता तातडीने त्याचे काम सुरू करावे. तसेच, बहुतांशी रस्त्याला खड्डे पडलेले असून रस्त्याच्या साईट पट्ट्या खचल्या आहेत. त्याचे सुद्धा लवकरात लवकर काम मार्गी लावावे. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशा सूचना चित्रलेखा पाटील यांनी दिल्या आहेत.

चिकणी पुलाच्या खचलेल्या भागाच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. यावेळी शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील, सरोज दिवेकर, रमेश दिवेकर, रिझावन फहीम, विक्रांत वार्डे, राहील कडू व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version