उपचाराअभावी बालकाचा मृत्यू

मोखाडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरविना प्रसूती

| पालघर | प्रतिनिधी |

पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ आरोग्यव्यवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या महिलेच्या प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

खोडाळा येथे राहणाऱ्या वैशाली बात्रे या महिलेला प्रसूतीसाठी बुधवारी (दि.22) सकाळी 10 वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रात्री 10च्या सुमारास तिची प्रसूती झाली. मात्र काही वेळातच बाळ दगावले. 12 तासांत जी काळजी घेणे आवश्यक होती ती घेतली गेली नाही. प्रसूती दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच हजर नव्हते. फक्त एक परिचारिका होती. बाळाला केवळ दोनच नाळ होत्या. त्याची वारही सुस्थितीत नव्हती. सोनोग्राफीत हा प्रकार दिसून आला. वैद्यकीय सल्ल्याअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टर अनुपस्थित असल्याने प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप वैशाली हिच्या पतीने केला आहे.
संतापजनक बाब म्हणजे प्रसूतीनंतर मृत बालक आणि माता यांना पुन्हा खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणा आणि मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Exit mobile version