नागरी वन उद्यानातील खाणीत बुडून मुलाचा मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडुन साकारण्यात आलेल्या रामनगर गणपती माथा टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वारजेतील रामनगर परीसरात घडली आहे. दक्ष सुशांत कांबळे (13) वारजे पुणे असे पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील रामनगर टेकडी परिसरालगत नागरी वन उद्यान असुन या उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये गुरुवारी (दि.15) रोजी दुपारच्या वेळी साधारण तेरा ते चौदा वर्षाची चार मुले पोहायला गेली होती, त्यातील मयत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला त्या सोबतची तीन मुले घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहीती घरी दिली नाही. मात्र सायंकाळ पर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहीती दिली. या घटनेची माहीती वारजे माळवाडी पोलीसांना मिळताच वारजे पोलीस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोध कार्य केले. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने रामनगर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version