| पेण | वार्ताहर |
पेण येथील 16 वर्षांच्या मुलीचा बालविवाह पालकांनी लावून दिल्यानंतर तिला सासरी पनवेल तालुक्यातील पोयंजेवाडी गावात पाठविण्यात आले. सात ते आठ महिन्यांची गरोदर मुलगी गरोदरपणासाठी पेण येथील आईवडीलांच्या घरी आली. पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या मुलीच्या वयाविषयी संशय आल्याने त्यांनी मुलीच्या आधारकार्डावरून वयाची चौकशी केल्यानतंर बालविवाहाच्या प्रकरणाला वाचा फुटली. अखेर या प्रकरणी मुलीच्या पतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी नोंदविण्यात आला.
गेल्या वर्षी 15 जुलै ते 23 नोव्हेंबर या दरम्यान पेण येथील पिडीतेचा विवाह पनवेल तालुक्यातील पोयंजे वाडीत 21 वर्षीय तरुणासोबत करुन देण्यात आला. या मुलीचे वय कमी असल्याचे माहिती असूनही तीच्यासोबत त्याने शरीरसंबंध ठेवले. मात्र ती गरोदर राहील्यावर प्रथेप्रमाणे तिला माहेरी पेण येथे पाठविण्यात आले. पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडे तिला उपचारासाठी घेऊन गेल्यावर डॉक्टरांच्या तपासणीमध्ये ती गरोदर असल्याचे समोर आले. तेथील डॉक्टरांना अल्पवयीन असल्याचा संशय आल्याने त्यांनी पिडितेचे आधारकार्ड व इतर कागदपत्रावरून तिच्या वयाची माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी हा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
सध्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गौरव इंगोले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलगीचे वय कमी असल्याचे माहिती असतानाही पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार संबंधित पिडीताने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.






