पोलिसांकडून नागरिकांच्या शंकांचे निरसन
। रसायनी । प्रतिनिधी ।
बालकांचे शोषण, बालविवाह रोखण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केवळ कायदे असून चालत नाही, तर समाजात जागरूकता असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून रायगड जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाणे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय (रायगड-अलिबाग) यांच्या वतीने खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंडेवाडी व चांगेवाडी येथे एका विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गुरुवारी (दि.5) मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन रायगड पोलीस आणि खालापूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन रायगड यांच्यामार्फत 1098 या आपत्कालीन क्रमांकाची माहिती देण्यात आली. प्रकल्प समन्वयक प्रकाश पवार यांनी सांगितले की, मुलांवरील अन्याय रोखण्यासाठी हा क्रमांक 24 तास सज्ज आहे. तसेच सहायक संरक्षण अधिकारी (खालापूर) मिथुन गुंजाळ यांनी पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रणा कशा प्रकारे हातात हात घालून काम करतात, यावर प्रकाश टाकला.
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, खालापूर पोलीस ठाण्याने या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रभावीपणे केले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना कायद्याची भीती न घालता, विश्वासात घेऊन बाल हक्कांची माहिती देणे हा या नियोजनाचा मुख्य उद्देश होता. खालापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सोंडेवाडी व चांगेवाडी भागात जाऊन ग्रामस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले.
खालापूर पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे या कार्यक्रमाला सोंडेवाडी आणि चांगेवाडी परिसरातील सुमारे 70 ते 80 महिला व पुरुषांनी उपस्थिती लावली. उपस्थित नागरिकांनी पोलिसांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. आमच्या गावात अशा प्रकारे पोलीस आणि प्रशासन स्वतःहून येऊन मार्गदर्शन करत असल्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटते, अशा भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
बालविवाहाबाबत सखोल चर्चा
कार्यक्रमात प्रामुख्याने बालविवाहाचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली. अश्वपरिस फाउंडेशनच्या डॉ. इशिका शेलार आणि प्रेरणा फाऊंडेशनच्या बेबीत कांबळे यांनी ग्रामीण भागातील माता-पित्यांना आवाहन केले की, मुलींचे वय 18 आणि मुलांचे वय 21 पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न करू नका. बालविवाह हा केवळ गुन्हा नसून तो मुलांच्या भविष्याचा घात करणारा प्रकार असल्याचे त्यांनी पटवून दिले.
