| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतही अशीच घटना घडली आहे. तुर्भे येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या संगिता खरात यांचा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्देवी मृत्य झाल्याची घटना शनिवारी (दि.19) रोजी घडली आहे. या महिलेला प्रसुती होऊन कन्यारत्न झाले, मात्र प्रसुतीच्या वेळी डॉक्टरच्या चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. संगिता खरात यांची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली असल्याने त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयातून बाजूच्या खाजगी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि डॉक्टरांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रसूतीदरम्यान होणार्या महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात अलीकडे वाढ होत असून, या घटनेनंतर खासगी दवाखान्यांवर आरोग्य विभागाचा अंकुश राहिला नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.