इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी आरतीचा मान

| रसायनी | प्रतिनिधी |

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान चौक इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव मंगळवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुकल्यांनी केलेल्या गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात वर्षावरील वातावरण भारावून गेले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली आणि नातू रुद्रांश हे या बाळगोपाळांसमवेत रमले. गळ्यात टाळ घालून मुख्यमंत्री ह्या मुलांसोबत आरतीसाठी उभे होते. मुख्यमंत्री प्रत्येक मुलाला बोलावून त्याच्या हातात आरतीचं तबक देत होते. यावेळी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी याच्याबरोबरच काही देशांचे वाणिज्यदूत देखील उपस्थित होते. त्यांच्या हाताने देखील आरती करण्यात आली. एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगड पोलिस अधीक्षक अशोक घार्गे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदिंचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचे यावेळी वाटप केले.

मंगळवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी यांनी गणेश दर्शन घेतले. सायंकाळच्या आरतीसाठी खास पाहुणे निमंत्रित होते. ते म्हणजे इर्शाळवाडीतील बांधव. त्यासाठी मुख्यमंत्री, वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी समन्वय केले. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेदरम्यान मदतकार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या काही दिवसामध्ये वर्षा बंगल्यावरील श्री गणरायाचे दर्शन आणि आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वरमधील आधार आश्रमातील मुलांनी वर्षा निवासस्थानी टाळ-मृदुंगाच्या गजरात आरती केली. त्यानंतर सायंकाळी इर्शाळवाडीतील बांधव सहभागी झाले होते.

Exit mobile version