इंद्रधनुष्यमधून बालकांना मिळणार बुस्टर

गोवर रूबेला आजाराच्या दुरीकरणासाठी प्रयत्न

| रायगड | प्रतिनिधी |

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे, की अर्धवट लसीकरण झालेले, तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर रूबेला आजाराच्या दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यापासून तीन फेऱ्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 या मोहिमेंतर्गत शून्य ते दोन वर्ष वयोगटांतील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचा गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल, त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार असून, 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहीम ही पहिला महिना 7 ते 12 ऑगस्ट, दुसरा महिना 11 ते 16 सप्टेंबर तर तिसरा महिना 9 ते 14 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत मोठ्या प्रमाणात झीरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अतिजोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसींचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, तसेच उपकेंद्राचे आरोग्यसेविकेचे पद तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी रिक्त असलेले क्षेत्र, स्थलांतरित होणारा भाग, गोवर-घटसर्प व डांग्या खोकला, 2022-23 या वर्षात उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे व प्रतिसाद न देणारे क्षेत्र यात विशेष मेहनत घेतली जाणार असून, यात लसीकरण करून घेण्यात येणार आहे.

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 अंतर्गत जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागात पुढील तीन महिन्यात झिरो ते दोन वर्ष, दोन ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने योग्य ती दक्षता घ्यावी.

‘डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड’

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असल्याने केंद्र सरकारने ऑगस्ट 2023 पासून तीन फेऱ्यांमध्ये ‌‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0′ कार्यक्रम हाती घेतला आहे. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ग्रामीण भागातील बालके व गर्भवती महिलांना या मोहिमेच्या कालावधीत 100 टक्के लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग प्रयत्न करणार आहे.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version