चिपळूणमध्ये मिरची भाव कडाडले

सर्वसामान्याचे कोलमडले बजेट, मिरचीचे 20 पेक्षा अधिक प्रकार बाजारात
चिपळूण । वृत्तसंस्था ।
मिरचीच्या दरात वाढ झाल्याने लग्नसराईपूर्वी वर्षभर पुरेल इतका मसाला करण्याची सवय असलेल्या गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मिरचीचे भाव गगनाला भिडल्याने मसाला करण्यासाठी करावयाच्या आर्थिक बजेटचे गणित जुळवताना महिलांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मिरचीचे भाव किलोमागे 200 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची तिखट झाल्याची प्रतिक्रिया गृहिणीकडून व्यक्त होत आहे.खवय्यांना चटकदार खाण्यासाठी जेवणात लागणारी मसाल्यासाठीची लाल मिरची बाजारात दाखल झाली आहे. लाल मिरचीचे 20 पेक्षा अधिक प्रकार ग्राहकांना पाहायला मिळतात. सध्या चवीसाठी लागणार्‍या बेडगी मिरचीला ग्राहकांकडून वाढती मागणी होत आहे. त्यातच मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करत आहेत. सध्या मसाल्यासाठी लागणार्‍या लाल मिरचीचे भाव 200 रुपयांपासून 400 रुपये किलोपर्यंत आहेत
मसाल्यासाठी लागणारी मिरची धुळे, नंदूरबार, जळगाव या प्रमुख तीन जिल्ह्यातून येते. काश्मिरी मिरचीचाही प्रकार आला आहे. यावर्षी मिरचीचे भाव 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. मसाल्यासाठीच्या लाल मिरचीतच पाटाया मिरचीला अधिक महत्त्व असल्याचे विक्रेते सांगतात. लाल मिरची विकत घेऊन मसाला केल्यानंतर हा मसाला गृहिणी वर्षभर पुरवितात. लग्नसराईत घरचा मसाला असेल तर जेवणाला वेगळी चव असते. गेल्या काही महिन्यांपासून महागाईत सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी विविध प्रकारच्या मिरचीचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे कौटुंबिक खर्चाची जुळवाजुळव करताना महिलांची दमछाक होत आहे.
चौकट
मिरचीचे दर
बेडगी मिरची 360ते 400 रुपये किलो
लवंगी मिरची 260 ते 300 रुपये किलो
गुंठूर मिरची 260 ते 280 रुपये किलो

Exit mobile version