| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील चांदई गावातील प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी माधव कोळंबे यांना यावर्षी दुहेरी फटका बसला आहे. त्यांच्या शेतातील मिरचीची 200 झाडे हि अवकाळी पावसाने रोगराईच्या भक्ष्यस्थानी आली असल्याने सुकून गेली आहेत. यावर्षी मिरचीच्या झाडांना हिरव्या मिरच्या बहरल्या नाहीत आणि त्यामुळे हजारोंचे नुकसान झाले आहे. कोळंबे हे गेली 20 वर्षे भाताची शेती करून झाल्यावर विविध प्रकारची भाजीपाला शेती करीत असतात. मात्र 21 मार्च रोजी अवकाळीमुळे होत्याचे नव्हते केले आणि त्या अवकाळी पावसाने मिरचीची झाडाची पाने सुकू लागली. भाजीपाला मळ्यामधून मे महिन्यापर्यंत उत्पादन निघत असते. मात्र यावर्षी एप्रिल महिना सुरु झाला आणि त्यांच्या शेतातील माल बाजारात जाणे बंद झाले आहे. या सर्व प्रकारामुळे कोळंबे यांचे हजारोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.